भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई; चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा ऐतिहासिक पराक्रम
पनवेल (प्रतिनिधी) कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या कु. स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावून देशासह पनवेल आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्वस्तिकाने क्रीडा आणि शिक्षणाचा उत्कृष्ट समतोल साधत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. स्वस्तिका घोष हिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २७ ऑगस्ट) तिचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी त्यांनी स्वस्तिकाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तिला ५० हजार रुपये बक्षिस दिले.
         यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, जी. के. सुर्वे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच स्वस्तिकाचे वडील आणि तिचे प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते. स्वस्तिका घोष ही लहानपणापासूनच टेबल टेनिसकडे आकर्षित झाली. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि खेळातील बारकावे आत्मसात करण्याची जिद्द या जोरावर तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. वेगवान हालचाली, आक्रमक शैली, अचूक फटके आणि प्रसंगावधान ही तिच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक सामन्यात आत्मविश्वासाने खेळ करत तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना स्वस्तिकाने आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर केला. संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय टेबल टेनिसच्या भविष्यासाठी आशादायी चित्र निर्माण झाले असून, युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
          विशेष म्हणजे, शिक्षण घेत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात यश मिळविणे ही स्वस्तिकाची कामगिरी कौतुकास्पद आहे. अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखत तिने विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. महाविद्यालयीन जीवनात मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे स्वस्तिकाने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. महाविद्यालयाच्या वतीने तिच्या क्रीडा कारकिर्दीला सातत्याने प्रोत्साहन देण्यात येत आहे.  स्वस्तिका घोषच्या सुवर्णयशामुळे पनवेलच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये पनवेलमधील युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत असताना स्वस्तिकाच्या यशाने या वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे. तिच्या मेहनतीची, जिद्दीची आणि यशाची प्रेरणा घेऊन अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
           कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वस्तिका घोष हिने आपल्या महाविद्यालयाचा, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा, पनवेलचा तसेच महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढविला आहे. तिच्या या देदिप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.  “स्वस्तिकाचे यश हे पनवेलच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असून, तिच्या मेहनतीतून आणि जिद्दीतून युवा खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा,” असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी स्वस्तिकाला शुभेच्छा देताना म्हटले. तर स्वस्तिकाला मिळालेले सुवर्णपदक जनार्दन भगत शिक्षण संस्थेला समर्पित करत असल्याची भावना, संदीप घोष यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *