आपले नवी मुंबई शहर शांतताप्रिय असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणशील व प्लास्टिकमुक्त साजरा करण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेने आपले योगदान द्यावे असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक देखावे करा, आरोग्य व संस्कृती संवर्धक उपक्रम राबवा आणि चांगल्या गोष्टींची जनजागृती करा असे आवाहन नवी मुंबईकर नागरिकांना केले.
यावर्षी 14 सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस व संबंधित प्राधिकरणे यांची श्रीगणेशोत्सव मंडळांसमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, नगरसेवक श्री.विशाल विचारे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक श्री.उमाकांत जंगले, अति.शहर अभियंता श्री.मदन वाघचौडे, सहा. पोलीस आयुक्त श्री.संदेश नाईक तसेच महानगरपालिका व पोलीस यांचेसह विविध प्राधिकरणांचे अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवादरम्यान नागरिकांना कोणत्याही अडचणीमध्ये संपर्कासाठी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा व त्या दूरध्वनीवरून सर्व प्राधिकरणांशी संपर्क साधता येईल अशी व्यवस्था करावी असे निर्देश महापौर महोदयांनी दिले. रस्ते दुरुस्ती तसेच स्पीडब्रेकरवर पट्टे मारण्यास प्राधान्य द्यावे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नागरिक दर्शनासाठी घराबाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करावे असेही महापौरांनी सूचित केले. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मार्ग नियोजन करावे व त्या मार्गातील झाडांच्या फांद्यांची व्यवस्थित छाटणी करावी आणि केबलचा अडथळा होणार नाही याचीही काळजी घ्यावी अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या.
सध्या मोरबे धरण 93 टक्के इतके भरलेले असून उत्सव काळात नागरिकांची विशेषत्वाने महिलांची अडचण होऊ नये यादृष्टीने सध्या सुरू असलेली पाणीकपात गोकुळाष्टमीपासून रद्द करण्यात येत असल्याचेही महापौरांनी जाहीर केले. मात्र पाणीकपात रद्द केली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने व जबाबदारीने पाण्याचा वापर करावा असे सूचित केले. गणेशोत्सव मंडळांनीही जलबचतीचा संदेश जास्तीत जास्त प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावा असेही आवाहन यावेळी महापौरांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नवी मुंबई महापौर गणेशदर्शन स्पर्धा २०२६’ आयोजित करीत असून यावर्षी घरगुती गणेशोत्सवासाठीही विशेष कॅटेगरी ठेवण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे मूर्तीच्या उंचीवरून मंडळांमध्ये होणारी स्पर्धा टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने ‘मूर्ती लहान पण भावना महान’ असे एक वैशिष्टयपूर्ण पारितोषिक या स्पर्धेंतर्गत लहान मूर्ती आणणाऱ्या सार्वजनिक मंडळांसाठी  देण्यात येईल असे महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी जाहीर केले.
महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मंडळांशी संवाद साधताना गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक परवानग्यांकरिता एक खिडकी योजना करण्यात आली असून त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावर्षीही मंडळांकडून परवानग्यांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
अनधिकृत बॅनर्समुळे शहर विद्रूप होते व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यादृष्टीने मंडळांनी मर्यादित प्रमाणात व निश्चित केलेल्या जागी परवानगी घेऊनच बॅनर प्रदर्शित करावे असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. मंडळांतर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये आरोग्यविषयक उपक्रमांवर भर द्यावा तसेच मंडपांमध्ये ओला व सुका कचरा संकलनासाठी दोन स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करावी असेही आवाहन त्यांनी केले. पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपून शाडूच्या मातीच्या मूर्ती आणाव्यात तसेच सहा फुटापर्यंतच्या मूर्ती मा. न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जित कराव्यात असेही आयुक्तांमार्फत सांगण्यात आले.
अभियांत्रिकी विभागामार्फत सर्व विसर्जन स्थळांवर आवश्यक व्यवस्था ठेवण्यात आली असून 150 हून अधिक कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे रस्ते सुधारण्याचे काम जलद गतीने सुरू असून गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण केले जाईल असेही त्यांनी गणेशोत्सव मंडळांनी मांडलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सांगितले.
परिमंडळ उपायुक्त श्री संजय शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव व्यवस्थित रितीने संपन्न व्हावा या दृष्टीने करण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची व ऑनलाइन परवानगी प्रणालीची सविस्तर माहिती दिली.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदेश नाईक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देत गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.
पुनरावर्तन संस्थेच्या प्रतिनिधींनी शाडू मातीच्या मूर्ती स्थापित करून व त्यांचे घरीच विसर्जन करून त्याची माती पुनर्उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित 75 हून अधिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी काही सूचना केल्या. याबाबत तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर व आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्वांनी परस्पर सहयोगाने यावर्षीचा गणेशोत्सव उत्साहात आणि नियोजनबद्ध रितीने साजरा करूया असा निश्चय व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *